Friday, 16 May 2008

स्वप्न

स्वप्नांत तुझ्या जरूर येईन, पण

कधीच स्वप्नं दाखवणार नाही

तुला घेऊन भरारी घेईन, याहून

अधीक पंख फाकवणार नाही


चंद्र, तारे चरणी वाहीन, असं

कधीच वचन देणार नाही

अशक्यातलं "अ" काढलं म्हणून

अशक्य शक्य होणार नाही


अंथ्रुना बाहेर जातील असं

पायांना पसरवणार नाही

शेवटी मध्यमवर्गीय आहे

हे कधीच विसरणार नाही


समाधानाच्या पुढे कधीच

इच्छेची गती ठेवणार नाही

चारबाय आठच्या खोलीत

राजवाड्याचा दरवाजा मावणार नाही


माझ्यापाशी प्रेम व काळजी

ह्या गोष्टींची कोणतीच सीमा नाही

अगणित हृदय शोधून बघ

इतकं प्रमाण कुठेच जमा नाही


हे सारं तुला मान्य असेल, तर

आहे त्या स्थितीत स्विकार कर

फक्तं माझचं स्वप्न पाहीलं असशील

तर, निसंकोच ते साकार कर ......

No comments: